#
News & Events

राष्ट्रीय सेवा योजना शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) चे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. २८/०१/२०१९ ते दि. ०३/०२/२०१९ या कालावधीत मौजे लौकी, ता. आंबेगाव येथे संपन्न झाले.

शिबिर कालावधीत श्रमदान सत्रामध्ये गावठाण, मंदिर, शाळा, स्मशानभूमी, ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण या नियमित कामांसोबतच जलसंधारण या कामावर मुख्यत्वे भर देण्यात आला. लौकी परिसरात असलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंधारण कामांतर्गत वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. कमी खर्चात जास्त पाणीसाठा होईल अशी जागा निश्चित करून १५०० ते २००० सिमेंट पिशव्यांमध्ये दगड, माती भरून जवळपास पाच लाख लिटर पाणीसाठा होईल असा बंधारा तयार करण्यात आला. याशिवाय पाण्याच्या सुलभ प्रवाहासाठी गटाराचे खोदकाम, शाळेच्या भिंतीची पडझड रोखण्यासाठी चर खोदकाम इ. कामे करण्यात आली.

दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये प्रत्येक दिवशी व्याख्यानमालेच्या माध्यमातून रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, रासेयो विभाग समन्वयक प्रा. संजय पोकळे, डॉ. नाना शेजवळ, डॉ. नितीन फुटाणे व डॉ. उत्तम काकडे या मान्यवरांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.

सायंकाळच्या सत्रामध्ये ग्रामसर्वेक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाशी समरस होण्याकरिता शिबिरार्थी स्वयंसेवकांनी गावाची ऐतिहासिक, भौगोलिक, कौटुंबिक, शैक्षणिक, जैवविविधिय इ. माहिती जाणून घेतली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सत्रात अंधश्रद्धा, डिजिटायझेशन व कॅशलेस व्यवहार, शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, विविध आजार व उपाय इ. बाबतीत पथनाट्य व प्रोजेक्टरवर सादरीकरण या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. याशिवाय शाळकरी मुलांकरिता प्राणायाम व विशेष परेडचे अनोखे आयोजन करण्यात आले होते.

शिबीर कालावधीत महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक यांनी शिबिरास भेटी व मार्गदर्शन याद्वारे शिबिरार्थी स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला.

शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांच्या हस्ते झाले. यावेळी लौकी गावचे सरपंच श्री. संदेश थोरात, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जि. प. शाळेतील शिक्षक श्री. राजगुरू सर, युवा कार्यकर्ते श्री. विकी थोरात, श्री. गजाबा थोरात, श्री. लक्ष्मण थोरात, श्री. संदीप काळे, श्री. संतोष थोरात, श्री. मंगेश काळे, श्री. संदीप आल्हाट, श्री. राजू आल्हाट, गावातील मान्यवर ग्रामस्थ तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, श्रीमती प्राजक्ता पिंपळकर, ता. प्र. सहा. अनिल राठोड व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.