Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कु. शुभम गाडेकर याचा “राज्यस्तरावरील आव्हान-चान्सलर्स बिग्रेड: आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर” आव्हान-२०२३ (AVHAN CAMP-2023) सहभाग

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी कु. शुभम भाऊसाहेब गाडेकर, तृतीय वर्ष, संगणक अभियांत्रिकी याने दि. २५ डिसेंबर, २०२३ ते ३ जानेवारी, २०२४ या दरम्यान गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पार पडलेल्या “राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर-‘आव्हान-२०२३’” मध्ये सहभाग नोंदविला.

युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राज्यस्तरावरील आव्हान-चान्सलर्स बिग्रेड: आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर दि. २५ डिसेंबर, २०२३ ते ३ जानेवारी, २०२४ या दरम्यान गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पार पडले. या “राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर-‘आव्हान-२०२३’” साठी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) या महाविद्यालयातील विद्यार्थी कु. शुभम भाऊसाहेब गाडेकर याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निवड करण्यात आली होती.

या शिबिरासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विविध महाविद्यालयामधून ७५ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा संघ पाठवण्यात आला होता. या शिबिरामध्ये राज्यभरातील एकूण ९६० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना नशामुक्ती, First-Aid, CPR, Soft Tissue Injury, भूकंप, पूर, दरड कोसळणे, आग लागणे, रस्ते अपघात, उष्माघात, त्सुनामी, Rope Rescue, Chemical-Biological-NuclearRadiation, इ. आपत्तींच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून काय उपाययोजना करता येतात व त्यातून स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवता येतो यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या १० दिवसांच्या शिबिरामध्ये एक दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांचा स्वयंसेवकांनी आपल्या जिल्ह्याच्या संस्कृतीचे दिलेल्या थीमच्या आधारे वैशिष्ठे मांडली ज्यातून सहभागी स्वयंसेवकांना विविध जिल्ह्यांच्या संस्कृती समजून घेता आली, तसेच आपल्या जिल्ह्याची संस्कृती राज्य पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली. या शिबिरामध्ये दि. ३० डिसेंबर रोजी Water Training आयोजित करण्यात आले होते, ज्यात कु. शुभम गाडेकर याने स्वतःची बोट बनवून आपला सहभाग नोंदवला. तसेच शिबिराच्या शेवटच्या दिवशी डॉ. अभय बंग यांच्या ‘शोधग्राम’ ला स्वयंसेवकांनी भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी तिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय, पुणे चे संचालक डॉ. अजय शिंदे, प्र. कुलसचिव डॉ. विजय खरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले, जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांचे प्रोत्साहन लाभले.

सदर विद्यार्थीनीस हे यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ, तसेच संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. शशिकांत घुंबरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त झाले.