राष्ट्रीय स्तरावरील 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानांतर्गत कर्तव्यपथ, दिल्ली येथे पार पडणाऱ्या अमृत कलश संकलन व समारोप कार्यक्रमात आंबेगाव तालुक्यातील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रशांत ढोले, हेमंत सुरवसे, ऐश्वर्या कोतकर आणि पायल घोलप हे चार स्वयंसेवक महाविद्यालयाचा अमृत कलश घेऊन सहभागी झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी दिली.
संपूर्ण देशभरातून शासनाच्या 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानांतर्गत विविध महाविद्यालयांनी गोळा केलेल्या अमृत कलशातील मातीचे कर्तव्यपथ, दिल्ली येथे संकलन करून अमृतवाटिका तयार केली जाणार असून त्या अमृतवाटिकेत विविध वृक्षरोपांची लागवड केली जाणार आहे.
महाविद्यालयामध्ये या राष्ट्रव्यापी अभियानाची सुरुवात दि.२० सप्टेंबर, २०२३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, संस्थेतील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ व टीम आणि रासेयोचे सर्व स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत झाली. या अभियानादरम्यान दि.०७ ऑक्टोबर, २०२३ रोजी डॉ. विनोद मोहितकर, मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणेचे सहसंचालक मा. डॉ. दत्तात्रय जाधव, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे उपसंचालक मा. डॉ. धनपाल कांबळे यांनी महाविद्यालयाल भेट दिली व यावेळी सर्व मान्यवरांनी “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत “अमृत कलशात” माती टाकली तसेच “सेल्फी विथ माय साॅईल” या अभियानांतर्गत मुठभर माती हातात घेऊन सेल्फी घेतले व या अभियानात सहभाग नोंदविला. या अभियाना दरम्यान अमृत कलश महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच महाविद्यालयातील इतर दर्शनी भागात ठेवण्यात आला होता. अमृत कलशात महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने आपल्या वास्तव्याच्या ठिकाणाहून आणलेली मुठभर माती टाकून “अमृत कलश” उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला. आणि हाच अमृत कलश घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे चार स्वयंसेवक कर्तव्यपथ, दिल्ली येथे पार पडणाऱ्या अमृत कलश संकलन व समारोप कार्यक्रमात सहभागी झाले.
याशिवाय, जागतीक विश्वविक्रम निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या “सेल्फी विथ माय साॅईल” या अभियानातदेखील महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी स्वतःचे, महाविद्यालयातील इतर विद्यार्थी, तसेच प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे सुमारे १२०० सेल्फी शासनाच्या लिंकवर अपलोड करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानांतर्गत “अमृत कलश” आणि “सेल्फी विथ माय साॅईल” या उपक्रमातील सक्रीय सहभागाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, सर्व विभागप्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांनी रासेयो स्वयंसेवकांचे अभिनंदन केले आहे.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: