#
News & Events

भारतासारख्या विकसनशील देशात महिलांना उद्योजकताकडे वळविणे व तरुण मुलीमध्ये त्यांच्या शैक्षणिक कालखंडात उद्योजक गुण विकसित करण्याकरिता स्वयंचल अभियांत्रिकी विभाग, शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) ता. आंबेगाव, जि. पुणे मार्फत विविध शाखेमधील विद्यार्थिनीसाठी, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई पुरस्कृत, “उद्योजकता विकास आणि सामाजिक जागृकतेतून महिला सक्षमीकरण”, या एक दिवसीय कार्यशाळेचे मंगळवार, दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळचे आयोजन हे अंतिम वर्षामधील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व इच्छुक विद्यार्थिनीसाठी करण्यात आले होते.

कार्यशाळेमध्ये डॉ. कमल वोरा, वरिष्ठ उप-संचालक तथा ARAI (ऑटोमोटीव रिसर्च असोशीएशन ऑफ इंडिया) अकॅडमी प्रमुख, पुणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आणि दृष्टीकोन असणे आवश्यक आहे असे सांगितले. महाविद्यालयात महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात त्याबद्दल त्यांनी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे कौतुक केले.

कार्यशाळेमध्ये श्री. सुरेश ब. उमाप, पुणे विभागीय कार्यकारी अधिकारी, उद्योजकता विकास महाराष्ट्र राज्य केंद्र, शिवाजीनगर, पुणे यांनी उद्योजकता विषयक जागृती निर्माण केली. आर्थिक, साहित्य आणि वेळेचे व्यवस्थापन हे तीन गुण आईकडून मुलींवर बिंबवले जातात, त्यामुळे महिला यशस्वी उद्योजिका होऊ शकतात. तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपल्याकडे संवाद कौशल्य, तोंडी गोडवा व चिकाटी असणे आवश्यक आहे. मराठी माणसाने नौकरीकडे न धावता उद्योजक व्हावे व त्यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. नवीन उद्योग सुरु करताना उद्योगाबाबतचे ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी उद्योगामधील वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांसाठी छोटे व मध्यम उद्योग उभारणीकरिता राबविल्या जाणारे विविध शासकीय योजनेबाबतची माहिती दिली.

तसेच यशस्वी महिला उद्योजक सौ. चारुलता उत्तम भेके यांनी त्यांचा श्रीकृष्ण अॅग्रो इंडस्ट्रीज, कांदळी, जुन्नर, या फर्मच्या उभारणीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे त्यांनी अनेक अडचणींना तोंड देवून पेंडी पावडर बनविणारा श्रीकृष्ण अॅग्रो इंडस्ट्रीज फर्म उभा केला. तसेच श्री. सुनील शेटे, सेवानिवृत्त विभागीय समन्वयक, महाराष्ट्र राज्य सहकारी शेती आणि ग्रामीण विकास बँक यांनी नवीन उद्योग उभारणी करिता बँक कर्ज मिळवण्याबाबत मार्गदर्शन केले. श्री. शेटे म्हणाले उद्योग करताना मनुष्य बळ, पैसा, तांत्रिक साहित्य आणि विपणन या चार बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी स्टारटप इंडिया या अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबत माहिती दिली.

अंतीम सत्रात निरोप समारंभाचे प्रमुख अतिथी व वक्त्या श्रीमती अॅड. साधना बाजारे, न्यायलयीन वकील, खेड, पुणे यांनी महिलांचे हक्क, कायदेशीर अधिकार व महिलांवर होणारे शोषण रोखण्याबद्दलची जागरुकता निर्माण केली. या कार्यशाळेत आंबेगाव परिसरातील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर, बी. डी. काळे महाविद्यालय, घोडेगाव, जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय, कुरण, समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय, बेल्हे, सहयाद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालय, आळे फाटा इत्यादी महाविद्यालयातून एकून ९२विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यशाळेच्या आयोजनाकरिता प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ .डी.आर .पानगव्हाणे (विभागप्रमुख ) ,संयोजक श्रीमती पी.बी पिंपळकर, समन्वयक श्री एस.डी.पाटील , व सहसमन्वयक म्हणून श्री ए .जे .भोसले , (सहाय्यक प्राध्यापक स्वयंचल विभाग ) यांनी काम पाहीले. डॉ. अविनाश पंत, महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबाबत स्वयंचल अभियांत्रिकी विभागाचे प्रकल्प अधिकारी व अध्यापक वर्ग यांचे अभिनंदन केले.